Personal tools
 
You are here: Home Products Ganesh Chaturthi Ganesh 2010 गणेश चतुर्थीचे पर्यावरणावरील महत्त्व
Document Actions

गणेश चतुर्थीचे पर्यावरणावरील महत्त्व

श्री. विवेक गोडबोले, संस्थापक, श्री. कृष्ण यजुर्वेद पाठशाला, सातारा, यांच्याशी झालेली मुलाखत. २००८ मध्ये इकोएक्सिस्टने ही मुलखात घेतली होती. अध्यात्मिक दृष्टीकोन आणि निसर्ग व गणेश चतुर्थी या दोन्हीमधला मेळ समजून घेणे हा या मुलाखतीचा उद्देश होता. श्री. विवेक गोडबोले हे श्री. कृष्ण यजुर्वेद पाठशाळेच्या "तैत्तरिय" विभागाचे अभ्यासक आहेत. हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वैदिक शाळेचे संस्थापक व निसर्गप्रेमी आहेत. गणेश चतुर्थीच्या त्यांच्या विचारांमुळे इकोएक्सिस्टला खूप प्रेरणा मिळाली आहे. गणपतीची भक्ती व वातावरण सांभाळणे या दोन्ही गोष्टीत काही भिन्नता नाही हे ही श्री. गोडबोले आपल्याला समजावून सांगतील.


प्रश्न : आपण गणेश उत्सवची सुरवात कशी झाली हे सांगाल का?

उत्तर : गणेश चतुर्थी खऱ्या अर्थाने जर साजरी करायची असेल तर त्याची सुरवात कशी झाली हे समजून घेणे आवश्यक आहे.

गण म्हणजे समूह आणि जो समूहाचा अधिपती आहे त्याला गणपती असे म्हणतात. म्हणजे जो समूहांना एकत्र करतो. त्यात सर्व प्रकारचे समूह आहेत. त्यात कलेमधले आहेत, विद्येमधील माणसे आहेत, खेळामधील माणसे आहेत व कष्टकरी माणसेही आहेत. सर्व प्रकारची माणसे एकत्र गुंफणारा जो देव आहे तो म्हणजे गणपती.

गणपती हा बुद्धीची देवता आहे. एखादया फुलाच्या माळेमध्ये दोऱ्याचे जसे काम आहे तसे काम हे आपला गणनायक आपल्यासाठी करतो.

आपण जर थोडासा इतिहास पहिला, थोडे मागे गेलो तर सर्व समुदाय जो होता तो नदीकाठी रहात असत. ज्याकाठी जलाशय आहे किंवा पाण्याची सोय आहे.

ज्येष्ठ मासाच्या अखेरीपासून मृग नक्षत्र लागल्यापासून पावसाची चिन्हे दिसू लागतात. आकाशात काळे मेघ येऊ लागतात व सगळीकडे पावसाळी वातावरण दिसू लागते. वृक्ष वेली आनंदाने वर्ष ऋतूच्या आगमनाची वाट बघत असतात. निसर्गराजा ये. वरुणराजा ये. आम्हाला तृप्त कर. आणि तेव्ह्पासूनच आपले मातीचे उत्सवे सुरु होतात. आषाढ महिन्यातला "बेंदूर" हा सण. यानंतर श्रावण महिन्यात नागपंचमी जेव्हा आपण नागदेवतेची पूजा करतो. हे सण साजरे करून आपण निसर्गाचे आभार व्यक्त करतो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी येते गणेश चतुर्थी. पूर्वी लोक नदीकाठी स्नान करीत असत. पावसाळ्यात नदीचे पाणी हे स्वच्छ व शुद्ध असते. जमिनीत नवीन माती तयार झालेली असते. आपल्या सर्वांमध्ये एक कलाकार लपलेला आहे. पूर्वी लोक हीच ताजी माती घेऊन त्याला सुंदर आकार देऊन गणपतीची मूर्ती बनवत असत. आणि त्याची भक्ती करत असत. अशा प्रकारे आपण निसर्गाची, भूमी मातेची व निसर्गात रहाणाऱ्या सर्व प्राणी मात्रांची पूजा करतो, भक्ती करतो. जी आपल्या सर्वाना एकत्रित आणते.

अशी झाली गणपती उत्सवाची सुरवात.


प्रश्न : गणपतीची पूजा कशी करावी?

उत्तर : गणपतीचे घरी आगमन झाले की आनंदाला उधान येते. गणपतीच्या स्वागतासाठी काय करू काय नको असे सर्वाना होते.

आपण काही केले तरी ते खऱ्या भावनेने, प्रेमाने व श्रद्धेने करणे गरजेचे आहे आणि असे केले तरच आपण गणपतीला स्वतःमध्ये जाणवू शकू. आपण गणपतीची स्थापना करतो, त्याला आपल्या कुटुंबाचा एक भाग बनवतो. आपल्या हृदयात त्याला बसवतो.

आपण त्याची प्रार्थना करतो, आरती करतो. सूख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. तूच सूख देणारा आणि तूच दुःख हरण करणारा असे म्हणून त्याला आपण आपल्या घरात बोलावतो.


प्रश्न : गणपतीच्या पूजेसाठी हे सामान वापरले जाते त्या बद्दल आपण काही बोलाल का?

उत्तर : गणपतीला ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या प्रत्येक गोष्टीचे एक महत्त्व आहे जे निसर्गाशी निगडीत आहे. पूर्वी ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक होत्या व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरले जायचे नाहीत. हळद हि हळकुंड दळून बनवली जाते तर कुंकू हे ही हळकुंडाला चुन्याच्या निवळीत टाकतात ज्यामुळे त्याचा रंग लाल होतो अशा प्रकारे बनवतात. हळद, चंदन, अक्षता ज्या तांदुळापासून बनवल्या जातात अशा गोष्टी आपण गणपतीला अर्पण करतो. ह्या सर्व गोष्टींचे एक औषधी महत्त्व आहे. हळद जी औषधी (एन्टीसेप्टिक) आहे तर कुंकू हे थंड आहे. हळद आणि कुंकू या दोन्ही गोष्टी सौंदर्य देणाऱ्या आहेत तर चंदनाने शरीरामध्ये शीतलता जाणवते. कपाळाला कुंकू लावणे म्हणजे सूर्याचे दर्शन समजले जाते. याप्रकारे गणेशाला कुंकू लावणे म्हणजे प्रकाश अर्पण करणे आहे. अशाच प्रकारे आपण गणपतीच्या पूजे मध्ये दुर्वांकुराचा ही वापर करतो. गणपती ही बुद्धीची देवता आहे. आणि दुर्वांमुळे स्मरणशक्ती वाढते आणि त्यामुळे दुर्वा या गणपतीला आवडतात. "मोदक' जे गुल, तांदुळाची पिठी आणि नारळ यांपासून बनवला जातो, हाही गणपतीला खूप प्रिय आहे. मोदक हे तांदुळाच्या पिठीला उकडून बनवला जातो त्यामुळे तो शरीराला हानिकारक नाही.

प्रश्न : पूजा का करावी?

उत्तर : प्रत्येक भक्ताने आपापल्या पद्धतीने पूजा करावी. पूजेसाठी आपण जे काही मनापासून करतो ती पण एक पूजाच आहे. बालगोपालांनी पाली विद्या आणि कला गणपतीसमोर सदर करणे ही पण एक प्रकारची पूजाच आहे. पूजा म्हणजे "दर्शन", "प्रदर्शन" नाही. हे आपल्यातला असलेल्या देवाचे अस्तित्त्व आहे.

प्रश्न : गणपतीच्या मूर्तीचा रंग व आकार कसा असावा?

उत्तर : पूर्वी गणपतीच्या मूर्तीचा आकार ही मर्यादित असावा. तो कधीच १० ते १५ फूट नसावा. आपल्या हाताच्या पंजाइतकी असावी जेणेकरून आपण ती मूर्ती सहजपणे हातात धरून आणू शकू. या मूर्ती खूप रंगवलेल्या नसत. नैसर्गिक पदार्थ उदा: हळद, कुंकू याचा वापर केला जात असे. ह्या मूर्ती संपूर्ण भक्ती भावाने व सध्या प्रकारे फुलांनी रंगवल्या जायच्या. आपल्या भक्तीने आणि श्रद्धेने ह्या मूर्ती रंगवल्या जात असत.

प्रश्न : गेल्या काही वर्षांत गणपती उत्सव साजरा करण्याच्या स्वरूपात/ पद्धतीत कसा बदल घडला आहे आणि त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत?

उत्तर : स्वतःच गणपतीची मूर्ती तयार करण्याऐवजी कुंभार लोक या मूर्ती तयार करू लागले. पूर्वी नवीन ताज्या मातीपासून मूर्ती बनवल्या जात व गणपती फक्त दीड दिवसाच असे. परंतु, हळू हळू घट्ट मातीच्या मूर्ती बनू लागल्या व उत्सवाचा काळही ३, ५, ७, १० दिवस असा वाढत गेला. प्रत्येकाला आपल्या घरातून गणपती कधी जाऊच नये आणि हा आनंद संपूच नये असे वाटायचे. जेव्हा गणपती नंतर गौरीचे आवाहन होयाचे तेव्हा ५ दिवसांचा हा उत्सव ७ दिवसाचा झाला व गणपती बरोबर गौरीचे ही विसर्जन होऊ लागले. त्यानंतर बरेच लोक अनंत चतुर्दशीचे व्रत करू लागले व हळू हळू हा उत्सव १० दिवसाचा झाला. अशा प्रकारे घरात बनवलेल्या साध्या मूर्ती प्लास्टर ऑफ पैरीस चे रूप घेऊ लागल्या. साध्या गणेश पूजनाला एक बाजारी व सामाजिक स्वरूप येत गेलं. कुंभार जमातीसाठी मूर्ती बनवणं हे एक उत्पादनाचे साधन बनले.

व्यापारीकरणामुळे भक्तांचा दृष्टीकोन बदलत गेला व प्रार्थनेच्या बदल्यात काहीतरी मिळावा अशी अपेक्षा होऊ लागली. खऱ्या भक्तीमध्ये आपण देवाला व निसर्गाला पूर्णपणे अर्पित करतो.

खरा भक्त देवाच्या चरणी नतमस्तक होतो व तुला जे योग्य वाटेल ते तू कर असे म्हणतो. त्याला या प्रार्थनेच्या बदल्यात काही मागत नाही.


प्रश्न : गणपती उत्सवामुळे वातावरणाशी निगडीत जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते आपण कशा प्रकारे सोडवावे व त्यासाठी काय करावे?

उत्तर : खरी भक्ती काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. भक्ती म्हणजे आपल्या क्रियांचा होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. आपल्या घरातील मूर्तीची पूजा केल्यानंतर तिचे नदीत विसर्जन केल्यावर आपण जर नदीच्या होणाऱ्या अवस्थे बद्दल जर आपण विचार करत नसू तर आपण बुद्धी देवतेची उपासना करून काय उपयोग? आपण योग्य उपाय शोधले पाहिजेत. नैसर्गिक मातीपासून बनलेल्या मूर्तीच वापरा आणि त्या बाजारात उपलब्ध झाल्या पाहिजेत. आपल्या भक्ती मुळे निसर्गाला किंवा निसर्गातील प्राणीमात्रांना कुठलीही हानी पोचत नाहीना याचा आपण विचार कार्याला नको का? जर आपण गणपती दरवर्षी घरी नाहीच आणला तर गणपती आपल्यावर रागावणार नाही. कारण देव हा दयाळू आहे, तो तो नेहेमीच तुमच्यावर कृपेचा वर्षाव करत असतो. त्या देवतेला तुम्ही योग्य प्रकारे घरी बोलवा नाहीतर यथा संगते कर्म काही घडेना आणि घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कुठलेही कर्म नित करायचे नाही आणि पुण्याची, फळाची अपेक्षा करायला लागलो तर काय उपयोग. मोठ मोठे लाउडस्पीकर लावून देवाशी संवाद साधण्याची गरज नाही. ज्या वागण्याने आपले किंवा दुसर्याचे नुकसान होते किंवा शारारिक रित्या हानी होते त्याला भक्ती नाही म्हणत. भक्तीच करयाची असेल तर त्यामुळे निसर्ग कोपेल, निसर्गाला त्रास होईल अशा प्रकारची भक्ती करून कुठलीच गोष्ट साधता येणार नाही. तुम्ही जर तुमच्याच घरात गणपती विसर्जन केले तर कुठलाच वाद निर्माण होणार नाही आणि हानी होणार नाही. विसर्जनामाग्चा उद्देश हा आहे की जे जमिनीतून आले आहे ते परत जमिनीतच जावे. ज्या पाण्यात आपण विसर्जन करणार आहात ते पाणी स्वच्छ व शुद्ध आहे याची खात्री करा.एकदा विसर्जन झाले की हेच पाणी आपण झाडांना घालू शकता आणि या प्रकारे गणपती देवता परत जमिनीत जाईल जिथून ती आली आहे. गणपतीच्या सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकॉल याचा वापर टाळा. जय प्रकारे आपण आज राहत आहोत व गणपती उत्सव साजरा करत आहोत त्यावरून असे दिसून येत आहे की आपण निसर्गापासून खूप खूप दूर होत आहोत. अशाच प्रकारे आपण निर्माल्य कुम्पोस्त करून झाडांना घालू शकतो. हे आम्ही आमच्या पाठशाळेत नियमितपणे करतो. याचा आपल्याला व आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही उपयोग होऊ शकतो.

प्रश्न: गणपती हे कशाचे प्रतिक आहे?

उत्तर: आपणा जर गणपती बघितला आपल्याला दिसेल की त्याला माणसचे शरीर आहे व हत्तीसारखे डोके आहे. बऱ्याचदा लोकांना याचे आश्चर्य वाटते. हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे जो अतिशय बलवान आहे. हत्ती नेहेमी समूहामध्ये राहतो व फिरतो आणि सगळे निर्णय नेहेमी हत्तीण घेते. हत्तीसारखे बरेच गुण मनुष्यातही आहेत. हत्तीला अतिशय उत्कृष्ट प्रकारची स्मरणशक्ती आहे. आफ्रिकेमध्ये काही लोकांनी गेले काही वर्षे हत्ती या प्राण्यावर अभ्यास केला व त्यावरून असे लक्षात आले की हत्ती एखादी गोष्ट पाच ते दहा वर्षे लक्षात ठेवू शकतो. हत्तींकडे आपल्या कळपामध्ये आपले भाव, आपले दुःख, आपली इमानदारी व्यक्त करण्याची कुवत असते. जर एखाद्या कळपामध्ये एखादा हत्ती मरण पावला तर त्या दिवशी सर्व हत्ती शोक व्यक्त करतात. उपवास करतात. बाकी सर्व हत्ती मिळून ते मरण पावलेल्या हत्तीचे अंत्य संस्कार करतात. त्याच्यावर माती टाकतात. त्याच्यावर झाडाची पणे टाकतात. त्याला ते असेच टाकून जात नाहीत. हत्ती हा प्राणी श्राद्ध करतो. हत्ती मरण पावल्यावर एक वर्षानंतर सर्व हत्ती एकत्र जमा होतात व ज्याठिकाणी तो मरण पावला आहे त्या ठिकाणी ते येऊन फुले पाने अर्पण करतात. आणि आनंदोत्सव साजरा करतात. गणपती हा मुख असणारा, बुद्धी असणारा देव आहे जो मनुष्य सृष्टी वर प्राणी सृष्टी यांना जोडणारा दुवा आहे. गणपती हा शक्ती व बुद्धीचे प्रतिक आहे.

आपण शिव-पार्वती, गणपतीच्या गोष्टी ऐकल्या असतील पण तरीही या गोष्टींच्या पलीकडे जे सत्य आहे ते ही आपण जाणून, समजून घेतलं पाहिजे. गणपतीला चार असतात. त्याच्या एका हाताची मुद्रा "अभय" अशील असते. म्हणजे घाबरू नका असे दर्शवते. निर्भय व्हा. आणि हे जर हवा असेल तर सर्वांनी एकजुटीने एकत्र येणा जरुरी आहे. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाला सार्वजनिक सणाचे स्वरूप दिले. गणपतीचे वहान हे उंदीर आहे. का? उंदराकडे एखाद्या गोष्टीचे छोटे छोटे तुकडे करण्याची कुवत असते. आपल्यालाही असाच बुद्धीजीवाची गरज आहे जो एखादी गोष्ट खोलवर जाऊन तिला समजू शकेल व त्याचा अर्थ जाणून घेऊ शकेल. दुसरे लक्षात घ्या. जर एक उंदराची जोडी असेल तर एका वर्षात बावीसशे उंदीर तयार होतात. त्यांच्यात प्रजाजन शक्ती खूप असते. उंदरासारखीच ज्ञान ग्राहर्ण करणारी, जिज्ञासा असणारी प्रजा आपल्याला हवी आहे.

गणपतीच्या कंबरेला सापही गुंडाळला आहे. साप हे शक्तीचे प्रतिक आहे. जी शक्ती चागंल्या व वाईट दोन्ही गोष्टींसाठी वापरू शकतो. हा साप गणपतीच्या पोटाशी, त्याच्या बेंबी पाशी आहे, जिथे शरीरातला वायू असतो. अशा प्रकारे आपण गणपती व त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

गणपती हा निसर्ग चक्राशी जोडलेला आहे. आपण ज्यावेळी नदीवरची माती घरी घेऊन येतो. त्याच्यावर सगळे संस्कार करतो. त्याला भक्ती-भाव समर्पित करतो. आणि त्यानंतर तोच गणपती आपण नदीत विसाराजित करतो. गावातल्या सर्व सद्भावना त्या पाण्याबरोबर वहात वहात दुसऱ्या गावातील नदीला मिळतात, दुसऱ्यापासून तिसऱ्या गावात जातात. उगमापासून समुद्र्यापर्यंत आपण सर्वजण अशा प्रकारे मातिनी, पाण्यानी, सद्भावनेने एकमेकांना जोडले गेलो आहोत. शेजाऱ्याने अमुक प्रकारची रोषणाई केली म्हणून आपण त्याही पेक्षा जास्त चांगली रोषणाई करयाची हे बरोबर नाही. आणि विसर्जन झाल्यवर आपण हीच रोषणाई देकून देतो वर केरात टाकतो, हे करून आपण निसर्गाचे अजून नुकसान करत आहोत. नैसर्गिक वस्तूंचा, रंगाचा वापर करून, शाडूच्या मूर्ती आणा.


गणरायाला प्रार्थना करा की आम्हाला योग्य गोष्टींचा वापर करण्याची सुबुद्धी द्या. गणपती हा एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी नाही. निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. निसर्गाला सन्मानित करता नाही आला तर त्याला अपमानित तरी करू नका. खरी भक्ती म्हणजे प्रदर्शन नव्हे. खरी भक्ती हा आत्मिक आनंद आहे.

 
 
 
Designed and managed
under EkDuniya initiative of
OneWorld
 
 

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: